कोल्हापूर :
जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगाम एका महिन्यावर आला आहे. जिल्ह्याच्या कृषी खात्यात अधिकारी कर्मचारी अशी एकूण ३१९ पदे रिक्त आहेत,जिल्ह्यातील चार तालुक्यांचे कृषी अधिकारी पद रिक्त असून प्रभारी व्यक्तीकडून काम सुरू आहे. यामध्ये दरवर्षी वाढणारी नैसर्गिक आपत्ती , खरिपात खते, बी बियान्याचे नियोजन होणार का असा प्रश्न असून यंदाचा खरीप हंगाम रामभरोसे राहणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सुमारे सात लाख शेतकरी खातेदार आहेत. बहुतांश तालुक्यात मुख्य पीक ऊसाचे असले तरी, सोयाबीन, भात अशी पिके घेतली जातात. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती वाढत आहे. वादळी वारे, पाऊस अतिवृष्टी व महापुराने पिकांचे नुकसान होत आहे. अशावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजनांचे नियोजन करणे कर्म प्राप्त ठरत आहे.
गेली वर्षभर जिल्हा कृषी अधीक्षक पद रिक्त होते, काही दिवसापूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक रुजू झाले ,मात्र सहा महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे पुन्हा अधीक्षक पद रिक्त राहील यामुळे जिल्ह्याचा कृषी खात्याचा कारभार पुढे प्रभारी पद्धतीने चालणार आहे.आत्मा प्रकल्प अधिकारी दीड महिन्यानंतर सेवानिवृत्त होतील. यामुळे आत्मा विभागाच्या आत्म्याचाच प्रश्न आहे. कोल्हापूर गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी पदे रिक्त आहेत, यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन बनले आहे . तसेच जिल्ह्यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक पदेही रिक्त आहेत.
करवीर ,पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड तालुक्याचे कृषी अधिकारी पद गेली वर्षभर रिक्त आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच आस्थापना, लेखा,तंत्रज्ञान, प्रशासकीय, तांत्रिक जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर असते, चार तालुक्यांची पदे प्रभारी असल्यामुळे धोरणात्मक कामाला खीळ बसली आहे.
पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता सोडण्यात आला आहे, या योजनेतील कामे प्रलंबित आहेत. महाडीबीटी, यांत्रिकीकरण यासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. दरवर्षी जिल्ह्यात महापूर व अवकाळी पावसाची नैसर्गिक आपत्ती वाढत आहे .खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यासाठी खते बी बियाणे याचे नियोजन करावे लागणार आहे .खरिपाच्या तोंडावर प्रभारी अधिकारी असणे म्हणजे योजनांचा सावळा गोंधळ असून, खरीप हंगाम रामभरोसे राहणार असल्याचे चित्र आहे.
……………….
रवींद्र पाटक, कृषी उपसंचालक,
वादळ अवकाळी पावसाची नुकसानीची माहिती मागवीली आहे. खरिपाचे नियोजन सुरू आहे ,अधिकारी कोण असो अगर नसो काम व्यवस्थित सुरू आहे .प्रभारी अधिकारी असले तरी त्यांना जबाबदारी असते.
…………..
जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी अशी ८१७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९८ कार्यरत आहेत. अधिकारी कर्मचारी अशी एकूण जिल्ह्यात ३१९ पदे रिक्त आहेत. गेली काही वर्ष रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळालेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असूनही कृषी क्षेत्राचा पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.