राजेश पाटील यांची केडीसीसी बँकेच्या संचालकपदी निवड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार, स्व. साहेबांचा सर्वसमावेशक वारसा पुढे नेणार असल्याचा राजेश पाटील यांचा मनोदय
कोल्हापूर :
केडीसीसी बँकेचे संचालक आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर दिवंगत आमदार पाटील यांचे सुपुत्र राजेश पी. पाटील सडोलीकर यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या आजच्या (सोमवारी ) बैठकीत ही बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या वतीने राजेश पाटील यांचा सत्कार केला. अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था उपनिबंधक श्री. नीलकंठ करे यांनी काम पाहिले.
यावेळी नूतन संचालक राजेश पाटील यांनी स्व. आमदार पी.एन.पाटील साहेबांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँक, शेतकरी, विकास संस्था यांच्या हिताला प्राधान्य दिले. गटातटाचा विचार न करता सर्वांची कामे केली. साहेबांचा हा सर्वसमावेशक वारसा पुढे नेणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांनी सलग ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम करताना बँकेच्या भरभराटीचा वं शेतकरी हिताचा कायम विचार केला. संचालक मंडळाच्या प्रत्येक बैठकीला जातीनिशी हजर असायचे. सभागृहाच्या ईशान्य कोपऱ्यातील खुर्चीत ते बसायचे. आज त्या खुर्चीत त्यांचे सुपुत्र राजेश पाटील बसले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांचा सहकार- समृद्धीचा आणि शेतकरी हिताचा वारसा त्यांचे सुपुत्र राजेश पाटील हे निश्चितचं जोपासतील.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी यांचेसह पाटील यांचेसोबत आलेले गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, भारत पाटील भुयेकर, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, शिवाजी कवठेकर, रामचंद्र भोगम, बी.एच.पाटील, रणजित पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, दादाबँके,राजीवजी सूतगिरणी, निवृत्ती संघाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.