७,१२८ कोटी ठेवीसह, १४७ कोटी ढोबळ नफा व ११ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा बँकेने यशस्वीरित्या पार केला…..
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा मंगळवारी ता. १३ गुढीपाडव्यादिवशही सुरूच राहणार आहेत. बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाखा सुरू राहणार आहेत. ग्राहकांनी या शुभ मुहूर्तावर जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, केडीसीसी बँकेने चालू आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट घेतले आहे.
दरम्यान, दि.३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या ठेवी रु. ७१२८ कोटी व ढोबळ नफा रु.१४७ कोटी झाला आहे. सी. आर. ए. आर. १२.२५% व निव्वळ एनपीए २.३८% इतका आहे. बँकेचा संयुक्त व्यवसाय रु. ११,७०० कोटी झाला असून बँकेच्या सर्व म्हणजेच १९१ शाखा नफ्यात आहेत. बँकेने दि. एक एप्रिलपासून शेती, साखर कारखाने, इतर संस्था व व्यक्तीगत कर्जावरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. शेतकऱ्यांना शून्य % व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी रुपये पाच लाखापर्यंतचे पीककर्ज देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. बँकेकडून १००% कर्ज घेवून बँकेकडे १००% कारखाना बिले वर्ग करणाऱ्या पिक कर्जदारास २% रिबेट मिळणार आहे. शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यास विमा संरक्षण देण्यासाठी लवकरच निविदा मागविणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.