कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे

कृषी मंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर जिल्ह्यातील उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

कोल्हापूर :

कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, असे सांगून शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये,जेणेकरुन दुबार पेरणी करावी लागणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन या पिकांच्या उत्पादकता वाढवावी. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत. तसेच आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारावा व उत्पादन अधिक होण्यासाठी ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जादा दर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी 50 टक्के निधी राखीव ठेवण्यात येत आहे, असेही सांगितले.

कोल्हापूर समृद्ध जिल्हा आहे. कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. कोल्हापुरी गुळ, आजरा घनसाळ तांदळाला भौगोलिक (जीआय) मानांकन मिळाले आहे. कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे(मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठीही सहकार्य करु, असेही त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते, तर हा सप्ताह ‘कृषी संजीवनी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगून यानिमित्ताने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद, त्यांचे योग्यपद्धतीने पोषण व्हावे, यासाठी ‘किट’ देण्यात येणार आहे, असे सांगून आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ‘किट’ घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरीत करावे, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना दिली. या भागात शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कृषी क्षेत्राच्या संपन्नतेसाठी ओळखला जातो. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऊस उत्पादकता वाढ मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अल्प काळाचे पिक उत्पादन, नवीन जोडधंदे याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. शिरोळ, हातकणंगले तालुक्याचे पोषक हवामान पाहता याठिकाणी संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!