शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे बंद करा : सुशील पाटील कौलवकर : राधानगरी महावितरणला निवेदन
राधानगरी :
शेतकऱ्यांना विचारात न घेता, महावितरणकडून माघारीच कृषी पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे चुकीचे काम सुरू आहे. अशा पध्दतीने वीज कनेक्शन तोडणे बंद करा, अशा मागणीचे निवेदन राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी महावितरणचे अभियंता गिरीश भोसले यांना देण्यात आले. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांचे ऊस अजून शिवारात आहेत. काही ऊस गेला आहे त्याची बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. त्यामुळेच मार्चपर्यंत वीज बिले भरण्यास मुदतवाढ द्यावी. मीटररीडिंग घेऊन त्याप्रमाणे दुरुस्ती करून कृषी पंपांची बिले द्यावीत. जून ते सप्टेंबर अखेर मोटारी पावसाळ्यात बंद असतात, त्यामुळे त्यादरम्यानची बिले झिरो करून द्यावीत. शेतकरी अडचणीत आहेत. याचा विचार करून महावितरणने शेतकऱ्यांना परस्पर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा लावलेला सपाटा तात्काळ बंद करावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर सुशील पाटील कौलवकर, विश्वजित वाडकर, दिगंबर येरुडकर, आर.जी. चरापले,सचिन पाटील, मंदार किरुळकर, विलास हळदे, युवराज रायकर, हिंदुराव रायकर, अमर पाटील, बाबू चौगले, दीपक भामटेकर, साताप्पा पाटील, सुनील हातकर, मोहन शिंदे, सागर पाटील यांच्या सह्या आहेत.
सहाय्यक अभियंता अनमोल भोसले, नवनाथ जाधव, लाईनमन युवराज चौगुले व परिसरातील महावितरणचा स्टाफ, परिसरातील शेतकरी, युवक उपस्थित होते.