करवीर :
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांना जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक गणिते बिघडली, जीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोना लस घ्या.. सुरक्षित राहा , असे आवाहन माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
कसबा बीड (ता.करवीर) येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सूर्यवंशी बोलत होते. यावेळी गोकुळचे संचालक सत्यजित पाटील, शामराव सूर्यवंशी, सरपंच सर्जेराव तिबिले, महेचे सरपंच सज्जन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र व कसबा बीड आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी पुढे म्हणाले, उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू झाल्यामुळे गावाशेजारी ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे सोईचे झाले आहे. तालुक्यात लवकरात लवकर लसीकरणाची गती वाढवणे गरजेचे आहे. लसीकरण केल्याने कोणताही धोका नाही, त्यामुळे गावागावात ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी या लसीकरण चळवळीला व्यापक स्वरूप द्यावे. जनजागृतीस सर्वांनीच हातभार लावून आरोग्य विभागास सहकार्य करूया.
जिल्हाधिकारी यांना उपकेंद्रात लस मिळावी असे निवेदन दिले होते.त्यानुसार उपकेंद्रात लस उपलब्ध झाली आहे.यामुळे नागरिकांच्या तुन समाधान व्यक्त होत आहे .
यावेळी आरोग्य सहायक मेहबुब शेख यांनी उपकेंद्रात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील शुगर, बीपी व्याधीग्रस्त तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस चालू केली असल्याचे सांगितले.
स्वागत शिरोली पीएचसी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केले. यावेळी दिनकर सूर्यवंशी, आत्माराम वरुटे, कसबा बीडच्या उपसरपंच वैशाली दिनकर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर गावडे, सचिन पानारी, वैशाली पाटील, जयश्री कांबळे, अंजना कुंभार, महेच्या उपसरपंच रूपाली बोराटे, ग्रामपंचायत सदस्य एस.डी. जरग, शामराव कुंभार यांच्यासह आरोग्य विभाग कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.