ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून…
कोल्हापूर :
शाळा यांची आणि आमची….
काळम्मावाडीकडे जाताना फराळे धनगरवाड्या जवळ ही शाळकरी पोरं झपापा पावलं टाकत निघाली होती. दिवस बऱ्यापैकी मावळत आला होता. चालता चालता ही पोरं रस्त्यालगतच डाव्या हाताला एका छोट्या पायवाटेला वळली.
पुढे आणखी वेगात जाऊ लागली. मला काय रहावले नाही मी ही त्यांच्या मागे गेलो. पोरं माझा अंदाज घेत घेत थांबली. त्यातनही दोघं तिघं पळालीच. मी विचारलं, ‘अरे पळताय का? पोर म्हणाली , “रस्त्यात कवा कवा गवं असत्यात. आता महिना झाला अस्वलबी फिरतय. अस्वल लय डेंजर !म्हणून शाळा सुटली की सुसाट घराकडं पळायचं.” मी पोरांकडं बघतच राहिलो.
त्यांच्या बरोबर एक फोटो काढून परत निघालो. आणि”आम्ही असे शिकलो, तसे शिकलो, असल्या आमच्या भरल्या पोटावरच्या गप्पात काहीही दम नसतो” हे मनातल्या मनात मी समजून गेलो…