पॅरीस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास, खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षानी महाराष्ट्राला मिळाले पदक
कोल्हापूर :
१९५२ साली खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राला कुस्तीत कांस्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राला या पदकापासून दूरच होता. आज तब्बल ७२ वर्षांनी भारताच्या स्वप्नील कुसाळेने उत्कृष्ट कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातला आणि कोल्हापूरच्या कांबळवाडीच्या (ता. राधानगरी) स्वप्नीलने इतिहास रचला.
स्वप्नीलने देदीप्यमान कामगिरी केल्यामुळे देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन करत एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
भोगावती कारखान्याच्या पब्लिक स्कुलनंतर इयत्ता आठवीनंतर स्वप्नील पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात नेमबाजीच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्वप्नील अचूक वेध घेत नेमबाजीत कांस्यपदक पटकावताच कुसाळे याच्या कांबळवाडी गावासह राधानगरी व कोल्हापुरात एकच जल्लोष करण्यात आला. स्वप्नीलच्या आईवडिलांसह त्याच्या आजीचा आनंद ओसंडून वाहत होता.
मागील वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याबद्दल भोगावती कारखान्या वतीने दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी दिवंगत आमदार पाटील यांना, ‘ स्वप्नील, पदक घेऊन या, तुमचा सत्कार करायला आम्ही पुढे असू’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, आमदार प्रकाश आबिटकर यांचेसह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वप्नीलचे या अभूतपूर्व यशाबद्दल तोंड भरून कौतुक होत आहे.