कांचनवाडी ते हसूर फाटा रस्त्यासाठी रू. ४ कोटी ८७ लाखाचा निधी : आ.पी.एन.पाटील
कोल्हापूर:
करवीर व राधानगरी तालुक्यातील अनेक गावांना जलद जोडणारा व सोयीचा ठरणाऱ्या कांचनवाडी ते हसुर दुमाला फाटा या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते पायाभुत सुविधा निधीतून 4 कोटी 87लाख 31हजार रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ.पी.एन.पाटील सडोलीकर यांनी दिली.

चांदे (ता.राधानगरी) कांचनवाडी, भाटणवाडी, हसूर दुमाला, कुरूकली ते येवती पाटी हा अकरा किलोमीटर्सचा रस्ता गगनबावडा तुळशी धामणी खोरा भोगावती खोऱ्याला जोडला जातो. या रस्त्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी होत होती.
त्या अनुषंगाने आ.पाटील यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ना.गडकरी यांनी त्याअंतर्गत कांचनवाडी फाटा ते हसूर फाटा या रस्त्यासाठी 4 कोटी 87 लाख 31हजार रूपये मंजूर केले आहेत. मंजूरीचे पत्र ना.गडकरी यांनी आपणाला पाठवले असून ना.गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. या रस्त्यामुळे तुळशी धामणी खोऱ्यासह गगनबावडा तालुका भोगावती खोरा व करवीर चा दक्षिण भाग जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे.