पुणे :
एरवी पोलिसांकडे एक खाकी वर्दीतील रागीट, तापट स्वभाव, खड्या आवाजात अगदी कडक बोलणारा आदी नजरेतून पाहिले जाते. मात्र पुणे येथील कात्रज घाटातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलेल्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाला जीवदान देण्याच्या घटनेतून पुढे आलेला सहायक पोलीस निरीक्षक मधुरा
दिंडे – कोराणे या कोल्हापूरच्या कन्येचा खाकी वर्दीतील माणुसकीचा ओलावा सर्वांनाच भावून गेला. खाकीतील माया, ममता याचे उत्तम उदाहरण मधुरा दिंडे – कोराणे यांच्या कार्यातून दिसल्यानेे त्यांच्या कार्याची कौतुक होऊ लागले आहे.

पुणे येथे सेवा बजावणाऱ्या स.पो.नि.मधुरा दिंडे – कोराणे यांनी जीवदान दिल्याची घटना घडली.
त्यांचे माहेर फुलेवाडी तर करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या सून आहेत. त्यामुळे पुणे,कोल्हापूरसह राज्यभरातून खाकी वर्दीतील ममत्वाचे दर्शन घडविणाऱ्या मधुरा दिंडे – कोराणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मधुरा दिंडे – कोराणे या पुणे येथे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माहेर फुलेवाडी तर करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या सूनबाई आहेत. बहिरेश्वर येथील जयसिंग बाबुराव दिंडे यांच्या त्या पत्नी आहेत.
मधुरा दिंडे – कोराणे या नाईट ड्युटीवर असताना कात्रज घाटात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याची माहिती पहाटे पाच – सहाच्या सुमारास
मिळताच क्षणाचाही विलंब न लावता मधुरा दिंडे – कोराणे यांनी आपल्या सहकाऱ्याला घेऊन दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेतली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात अर्भक रडत असताना दिसताच काही सेंकदात त्यांनी त्या बाळाला आपल्या कडेवर घेतले. काखेत कवटाळले व सहकाऱ्यासोबत दुचाकीवर बसून थेट ससून रुग्णालय गाठले. मधुरा दिंडे – कोराणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे वेळेत बाळावर उपचार झाल्यामुळे
त्या बाळाचा जीव वाचण्यास मोठी मदत झाली.
दिंडे – कोराणे या ढिगाऱ्यातून बाळाला उचलून कडेवर घेऊन दुचाकीवरून जातानाचा व्हिडीओ प्रत्यक्षदर्शी लोकांनी चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. खाकी वर्दीतील ममत्वाचे, माणुसकीच्या ओलाव्याचे हे दर्शन पाहून दिंडे – कोराणे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होऊन त्यांच्या कार्याचे कौतुक होऊ लागले.