केडीसीसी बँक अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना देणार अधिकाधिक सवलती
संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसायासाठी वित्तपुरवठ्यामध्ये जिल्हा बँक अग्रेसर
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना अधिकाधिक सवलती देणार आहे. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने मध्यम मुदत कर्जाची मुदत पाच वर्षावरून वाढवून ती सात वर्षे अशी केली आहे. या महामंडळाअंतर्गत लाभार्थ्याच्या वयोमर्यादेची अट ५० वर्षांपर्यंत होती. तीही वाढवून ती साठ वर्षांपर्यंत केली आहे. विशेष म्हणजे, स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी ज्या प्रवर्गासाठी कोणत्याही आर्थिक विकास महामंडळाची तरतूद नाही, अशा प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थपुरवठा करणार आहे. स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसायासाठी १५ लाख रुपये कर्ज मंजुरीची मर्यादा असून साडेचार लाखापर्यंतच्या मर्यादेत व्याज परतावाही मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयासह जिल्हाभरातील खेड्यापाड्यांमध्ये १९१ शाखा आहेत. ग्रामीण भागातील एवढ्या व्यापक शाखा विस्तारामुळेच लाभार्थ्यांना शाखा पातळीवर माहिती आणि मार्गदर्शन होण्यास मदत मिळते. त्यामुळेच बँकेने आज अखेर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना कोट्यावधींचा वित्तपुरवठा केलेला आहे.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, खासदार प्रा. संजयदादा मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रा. अर्जुन आबिटकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.