महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृती आराखडा सादर करण्याचे आवाहन
कोल्हापूर :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2022-23 करिता लेबर बजेट नियोजन व कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. याव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी आप-आपल्या गावची शिवार फेरी करून माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांचा समावेश कृती आराखड्यात करून घ्यावा. हा कृती आराखडा मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयास लवकरात-लवकर सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
मग्रारोहयो योजना ही ग्रामीण भागाचा कायापालट करणारी महत्वाकांक्षी योजना आहे. अकुशल रोजगाराची पुर्तता दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याव्दारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करून देवून ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावणे व कायमस्वरूपी मालमत्ता तयार करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमध्ये पुढीलप्रमाणे वैयक्तिक व सार्वजनिक कामांचा समावेश होतो.
वैयक्तिक लाभाची कामे- वैयक्तिक जलसिंचन विहीर, रेशीम उद्योग (तुती लागवड व किटक संगोपन गृह तयार करणे), शेततळे, शोषखड्डे, घरकुल, नाडेप खत निर्मिती, गांडुळ खत निर्मिती, वैयक्तिक शौचालय, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, गाय गोठे, विहीर पुनर्भरण, शेत बांध बंधिस्ती, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, संजिवक किंवा अमृत पाण्यासाठी खड्डा.
सार्वजनिक कामे- सार्वजनिक जलसिंचन विहीर, गाव तलाव, रोपवाटिका, पाणंद रस्ता, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, समपातळी चर, गॅबीयन बंधारा, मातीनाला बांध, दगडी बांध, एलबीएस, कंटुर बांध, क्रिडांगण, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय, नाला रुंदीकरण, माती बंधाऱ्याचे पुनर्जीवन, पाझर तलाव, गाळ काढणे.
अभिसरणातील कामे- शाळेसाठी खेळाचे मैदान/ संरक्षक भिंत बांधकाम, छतासह बाजार ओटा, शालेय स्पयंपाकगृह निवारा, नाला मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम, सिमेंट रस्ता, पेव्हींग ब्लॉक रस्ते, डांबर रस्ता, शाळेकरिता/ खेळाच्या मैदानाकरिता साखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सामुहिक मत्स्यतळे, सार्वजनिक जागेवरील शेततळे, क्राँक्रीट नाला बांधकाम, आर.सी.सी. मुख्य निचरा प्रणाली, भूमिगत बंधारा, सिमेंट नाला बांध, कॉम्पोझिट गॅबियन बंधारा, बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे, स्मशानभूमी शेड बांधकाम याप्रमाणे आहेत.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबास किमान 100 दिवस रोजगाराची हमी. ज्या कुटूंबाकडे जॉब कार्ड नसतील त्यांनी ग्रामपंचायतीस संपर्क करुन कामाची मागणी करणारा अर्ज आपल्या ग्रामपंचायतीकडे जमा करावा. मागणी केल्यानंतर 15 दिवसांत काम उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील.