कुंभी कासारी साखर कारखान्याचा ५९वा गाळप हंगाम शुभारंभ : साडेसहा लाख टन गाळप उद्दिष्ट अध्यक्ष चंद्रदीप नरके
करवीर :
यावर्षी महापुरामुळे नदीकाठच्या ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले असले तरी साडेसहा लाख टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीचा विचार करून साखरेला ३५ रूपये हमी भाव जाहीर करावा, अशी मागणी अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे.
कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५९व्या गळीत हंगाम शुभारंभ अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
साखरेला चांगला दर व मागणी येईल अशी परिस्थिती सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होती पण अचानक साखर दरात घसरण सुरू झाल्याने पुन्हा आर्थिक अडचणींना सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाने इथेनॉल धोरणाला प्रोत्साहन दिले असल्याने पुढील काळात त्याचा फायदा होईल, पण उसाला एकरकमी एफआरपी देण्यासाठी किमान ३५०० रूपये क्विंटल साखरेला हमीभाव मिळावा अशी मागणी नरके यांनी केली.
यावर्षी १० हजार २९६ हेक्टर ऊसाचे क्षेत्र गाळपासाठी नोंद झाले असून साडे सहा लाख मे. टन
ऊसाचे गाळप उदिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व सभासद,बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस कुंभी कासारी कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन केले.
यावेळी संचालक अँड. बाजीराव शेलार, विलास पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, उत्तम वरुटे, किशोर पाटील, दादासो लाड, आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, जयसिंग पाटील (ठाणेकर), पी.डी.पाटील, जयसिंग पाटील (यवलूज), आनंदराव माने,आबा रामा पाटील, माधुरी पाटील, अनिता पाटील, दिलिप गोसावी कामगार प्रतिनिधी सरदार पाटील, विलास गुरव,कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.