दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा : लाखो भाविक
कोल्हापूर :
दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची आज चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. जोतिबा डोंगरावर मंगळवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले होते. सासनकाठ्याही दाखल झाल्या आहेत.
चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता महाभिषेक महापूजा, तर १० वाजता धुपारती सोहळा झाला. हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघेल.
यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे. बैलगाडी, खाजगी वाहनातून, पायी चालत भाविक डोंगरावर आले आहेत.
सासनकाठीच्या मिरवणुकीस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. पहिला मान निनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो. मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी झाल्या आहेत. एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० ते ८० फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.