श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त वाहतूक नियमन
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
कोल्हापूर :
श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा येथे दि. १४ ते १६ एप्रिल या कालावधीत श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. यात्रा कालावधीत जुने आंब्याचे झाड (दानेवाड़ी क्रॉसिंग)- जुने एस.टी. स्टॅंड, मेन पार्किंग, यमाई पार्किंग ते गिरोली फाटा या दरम्यानचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाईचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केला आहे.
जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची प्रचंड संख्या, वाडी रत्नागिरी डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी, उत्सव काळात श्री. क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे मोटारवाहनांची रहदारी व यात्रा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी रहदारीचे नियमन करण्यात आले आहे.
दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ८ वा पासून ते दिनांक १६ एप्रिल चे रात्री २३.०० वा पर्यंत अंमलात राहिल. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील, तो कायदेशीर कारवाईस पात्र राहिल, असेही आदेशात नमुद आहे.