राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी ५ कोटी मंजूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाठपुरावा
मुंबई, दि. २७ एप्रिल:
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. दोन्ही नेते सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागामार्फत बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) यांच्याकडे पत्र पाठविले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.
कृतज्ञता पर्व….
देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव अग्रस्थानी आहे. केवळ २८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया त्यांनी रचला. राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू झाले. दि. ६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाले. या वर्षी या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन…
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत दि. २८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन कॉम्पिटिशन, नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप समिट, कुस्ती स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन, स्थानिक हस्तकला प्रोत्साहन मिळून त्यात वाढ होण्यासाठी सिटी बझार, चित्रकला प्रात्यक्षिक, सायकल रॅली, चित्ररथ, कृतज्ञता फेरी असे अनेक कार्यक्रम जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही आयोजित केले जाणार आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाठपुरावा…..
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृतज्ञता पर्वानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर करावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. महाविकास आघाडीतील या दोन्ही दिग्गज नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या कृतज्ञता पर्वासाठी निधी मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रयत्नांना यश आले असून नियोजनाप्रमाणे गुरुवारपासून विविध कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.