कोल्हापूर :
लंपी आजाराने कोल्हापूर जिल्ह्यातील 7 जनावरांचा शनिवारी एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 गायी आणि 2 बैलांचा समावेश आहे. कोल्हापूरात एकाच दिवशी 7 जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन प्रशासन उपाययोजना करण्यासाठी गतिमान झाल्याचे दिसत आहे.
कोणत्या भागातील दगावली : रांगोळी येथील बैल, चंदूर येथील दोन वर्षांची गाय, कबनूर येथील बैल आणि कोले यांची गाय, इचलकरंजी येथील दोन शेतकऱ्यांची प्रत्येकी एक गाय, अतिग्रे येथील एक गाय. अशा एकूण 7 जनावरांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे.
65 जनावरांना लागण, 22 झाले बरे ….. कोल्हापूर जिल्ह्यात लम्पि आजाराने बाधित असलेली आजपर्यंत अधिकृत 65 जनावरांचा समावेश आहे. त्यापैकी 7 जनावरांचा मृत्यू झाला असून 22 जनावरं बरी झाली आहेत.
उर्वरित सर्व जनावरांवर उपचार सुरू झाले असून जिल्हाभरात लसीकरण सुद्धा सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली.
हा आजार केवळ गाय, बैल यांना होत असल्याने याचा इतरांना धोका नाही त्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या अफवांना सुद्धा बळी पडू नका
असे आवाहन त्यांनी केले.
या काळात दूध सुद्धा आपल्यासाठी हानिकारक नसून कोणीही घाबरू नये असेही त्यांनी म्हंटले आहे. पशुधन मालकांनी आपल्या जनावरांचे वेळेतच लसीकरण करून घ्यावे जेणेकरून साथ रोगास अटकाव घालता येईल. लंपीचे भय न बाळगता आपल्या सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.