गोकुळची निवडणूक होणारच
कोल्हापूर :
गोकुळ निवडणुकीसंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचे आदेश देत मतदान घेण्याचा निर्णय दिला. त्यामुळे २ मे रोजी गोकुळची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने रद्द झाली होती. त्यामुळे ही सुनावणी आज झाली. आज सकाळी न्यायमुर्ती उदय ललित व ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत ही याचिका निकालात काढली. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकच गती येऊ लागली आहे.