यंत्रात बिघाड झाल्याने अचानक शाळेच्या पटांगणावर उतरले
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कुंभी कारखाना परिसरात एका खाजगी हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आकाशात घिरट्या घालत होते.पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर अचानक स.ब.खाडे महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरले. सुदैवाने प्रार्थना सुरू नव्हती,आणि विद्यार्थी पटांगणावर नव्हते, यंत्रात बिघाड झालेले हेलिकॉप्टर कोसळले नाही, आणि अपघात टळला, यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, साडेदहा वाजता कुंभी कारखाना परिसरात आकाशात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते.अचानक हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे , हेलिकॉप्टर खाली महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरवले.

कोरोना असल्यामुळे अकरा वाजता होणारी प्रार्थना बंद करण्यात आली होती, त्यामुळे पटांगणावर विद्यार्थी नव्हते. यामुळेही अनर्थ टळला आहे.
बिघाड झालेले हेलिकॉप्टर अचानक घाईगडबडीने कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरले. यावेळी परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी धाव घेतली. यावेळी विद्यार्थी व नागरिकांची एकच गर्दी झाली.
यावेळी महाविद्यालयाचे शिक्षकांनी पायलटशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.जमलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गात बसण्याची सूचना दिल्या.
तब्बल दोन अडीच तासानंतर बारा वाजता पोलीस आले, आणि यावेळी पायलट वेणू माधव यांनी सांगितले पुण्याहून एरो ट्रान्स या खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर अचानक खाली उतरवण्यात आले.पायलट सह सहा आसनी हेलिकॉप्टर आहे.हेलिकॉप्टर मध्ये पायलट व एक तांत्रिक व्यक्ती होता.हे हेलिकॉप्टर पुणे येथून आले होते, गारगोटी येथून पॅसेंजर घेऊन मुंबई ला जाणार होते.घटनेची
माहिती पुण्यात कंपनीला कळविण्यात आली, हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी प्रतिनिधी येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.