ग्रामस्थांकडून सन्मान ही चांगल्या कामाची पोहोचपावती : राजेंद्र सूर्यवंशी ( पशुवैद्यकीय सेवेबद्दल डॉ. माने यांचा सपत्नीक सत्कार)
करवीर :
शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे जनतेत मिसळून काम केले तर जनताही तितक्याच आपुलकीने त्यांचा आदर राखत असते. पशुवैद्यकीय सेवेतील डॉ.अनिल माने यांनी आपली सेवा आदर्शवत अशी निभावल्यामुळे आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरल्यानेच ग्रामस्थांकडून सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार होत आहे. ग्रामस्थांकडून सन्मान म्हणजे डॉ माने यांच्या चांगल्या कामाची पोहोचपावती असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
सावर्डे दुमाला (ता.करवीर) येथे भावेश्वरी मंदिरात श्री कामधेनू पशुपालक मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ.अनिल माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार व सदिच्छा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.माने यांचा उत्कृष्ट सेवा गौरव सन्मानपत्र, शाल, फेटा व सौ सीमा माने यांना मानाचा आहेर देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आनंदा मोहिते होते.
यावेळी डॉ.अनिल माने म्हणाले, सावर्डे गावातील माणसेच चांगली असल्याने मला चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळाले. ग्रामस्थांकडून होणारा हा सत्कार माझ्यासाठी बहुमूल्य आहे. यापुढेही हा ऋणानुबंध असाच कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केले. सर्जेराव भोसले, कुंडलिक भोसले, केकतवाडी सरपंच पंढरीनाथ नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भगवान रोटे, दत्तात्रय निकम, भगवान कारंडे, पिराजी मोहिते, भगवान पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ मोहिते, भिकाजी कांबळे, बाजीराव सुर्वे, दशरथ भोसले, मनोहर पाटील, गुंडू कारंडे, बाजीराव कारंडे, मारुती कारंडे, मंडळाचे अध्यक्ष सागर मोहिते, मच्छिद्र कारंडे, बळवंत भोसले, पंढरीनाथ निकम, एस.आर.कारंडे, तुकाराम पाटील, के.एम.पाटील, प्रकाश कदम यांच्यासह पशुपालक मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डी.के.निकम यांनी मानले.