‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत मिनरल मिक्चर मोफत या योजनेच्या कालावधीत वाढ : चेअरमन अरुण डोंगळे (योजना कालावधी दि.०१ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत)
कोल्हापूर, ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थेना त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी ‘कोहिनूर डायमंड’ आणि ‘गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर १ किलोची बॅग आपल्या दूध उत्पादकांना दि.०१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. या योजनेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील दूध संस्थांनी व दूध उत्पादकांनी ही योजना पुढे चालू करण्याबाबतची मागणी केली होती. याबाबत सविस्तर माहिती घेऊन व दूध उत्पादकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या योजनेच्या कालावधीमध्ये आणखी एक महिन्याची वाढ करून दि.०१ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ही योजना चालू ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने बैठकीमध्ये घेतला असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
गोकुळची महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्चर मोफत या योजनेच्या कालावधीमध्ये संघाने एक महिन्याची वाढ केली असून या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे सर्व दूध संस्थांनी पशुखाद्याची मागणी दि.२५ मार्च २०२५ पर्यंत महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याकडे करावी. दि.२५ मार्च २०२५ इ.रोजी पर्यंत केलेल्या पशुखाद्य मागणीचा पुरवठा ३१ मार्च २०२५ इ.रोजी पर्यंत केला जाणार आहे.
या योजनेबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे कळवली जाणार असून ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.