गोकुळ : महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत या योजनेचा शुभारंभ ( उत्तम प्रतीच्या दूध उत्पादन वाढीसाठी ‘गोकुळ’ चा नवा उपक्रम: चेअरमन अरुण डोंगळे )
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ या मिनरल मिक्श्चरची १ किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आज गणेश जयंतीचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळने गेल्या दोन वर्षापासून पशुखाद्यामध्ये कोणतेही दर वाढ केलेली नसून गोकुळच्या दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका गोकुळ नेहमीच घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार गोकुळच्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्चर मोफत हि योजना चालू केली असून पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टीमिन प्लसची दिडशे रुपये किंमतीची १ किलो बॅग मोफत देण्यात आली आहे. या फर्टीमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचे दूध, फॅट आणि एस.एन.एफ. वाढीमध्ये दिसणार आहे. यास्तव अत्यंत उपयुक्त असलेल्या फर्टीमिन प्लस या मिनरल मिक्श्चरचा प्रचार व प्रसार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकाने या फर्टीमिन प्लसचा नियमित वापर करावा, हा या योजनेमागील संघाचा महत्वाचा उद्देश असल्याचे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले.
ही योजना या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेर म्हणजेच दि. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीतच उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे प्रतिदिन दूध उत्पादन व उत्तम प्रत वाढीसाठी तसेच जनावरांच्या वंध्यत्व निवारणाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारची योजना राबविणारा महाराष्ट्रातील गोकुळ हा एकमेव दूध संघ आहे. या योजनेबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे कळवली असून ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.
याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.