गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम : चेअरमन अरुण डोंगळे

दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार.

                                

                 

कोल्हापूर ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या बँकेतील खात्यावर दि. २३ ऑक्टोबर २०२३ इ.रोजी जमा करण्यात येणार आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांनी दिली.

       आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दि.०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०.५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकाना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येईल.

      दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे.गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दूधाकरीता २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ % प्रमाणे   ७ कोटी १२ लाख ९५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ६ कोटी ५० लाख ९२ हजार रूपये असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली.

     या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या जवळजवळ ५,२०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १०१ कोटी ३४ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ३८ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रो ट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी, भविष्य कल्याण निधी,जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनावरती अनुदान व सेवासुविधावरती खर्च केले आहेत. याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर,टी.एम.आर.चा पुरवठा व अनुदानावर काफ स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे.

      गोकुळने दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्या दि.०२/०५/२०२३ इ.रोजी २० लाख लिटरची दूध विक्री केली आहे. उत्पादकांची तसेच संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्रति म्हैस उत्पादनांत वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमअंतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादक सभासदानी सहभागी होऊन संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री. डोंगळे यांनी केले.  

गोकुळची सन २०२२-२३ मध्ये ३,४२९ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असून यामध्ये दूध उत्पादक, विक्रेते, ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असून चेअरमन डोंगळे म्हणाले,“दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोकुळचे नेते नाम.हसन मुश्रीफसो व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू. यासाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले.

      गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दिपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदाना वाटप करून सभासदाचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले असून दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व सर्व हितचिंतक यांना दसरा व दिपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!