गोकुळच्या माध्यमातून कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेतंर्गत १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.कडून दूध उत्पादकांना उपलब्ध : चेअरमन अरुण डोंगळे
सिस्टीमा बायो पुणे यांच्याकडून गोकुळ दूध संघास ‘फ्लेम’ अॅवार्ड देऊन सन्मानित…
कोल्हापूर ता.०७:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी,(मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळच्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ३ हजार बायोगॅस प्रकल्प पूर्ण झालेबद्दल या योजनेत सहभागी असण्याऱ्या एन.डी.डी.बी, (मृदा), सिस्टीमा बायो व गोकुळ दूध संघाचे अधिकारी, पदाधिकारी, तसेच महिला नेतृत्व विकास अधिकारी, स्वयंसेविका यांच्या योगदान बद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम सिस्टीमा बायो पुणे यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित केला होता. हा कार्यक्रम गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक, एन.डी.डी.बी, सिस्टीमा बायोचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ ने नेहमीच ग्रामीण दूध उत्पादक महिलांना केंद्र बिंदू मानून महिला दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एन.डी.डी.बी., गोकुळ, सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत ५००० बायोगॅस मंजूर असून ४१ हजार २६० रुपये किमतीचा बायोगॅस दूध उत्पादकांना ५ हजार ९९० रुपये इतक्या किमतीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे लाभार्ती दूध उत्पादकांना रुपये ३५,२६० इतकी थेट सबसिडी मिळाली आहे. जिल्ह्याचा विचार करता ५००० उत्पादकांना एकूण १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.कडून गोकुळने उपलब्ध करून दिली आहे. तसेच नवीन प्रस्तावित ५००० बायोगॅसना मंजुरीसाठी पाठ पुरावा केला असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले कि, जानेवारी २०२३ पासून हा प्रकल्प गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.व गोकुळ राबवत आहे. सप्टेंबर २०२३ अखेर ५००० बायोगॅसची नोंदणी पूर्णहोवून ३००० बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत तर २००० बायोगॅस पूर्णत्वाकडे आहे. या बायोगॅस प्रकल्पामुळे अत्यंत कमी किमतीत दूध उत्पादकांना बायोगॅस युनिट उपलब्ध झाले आहे. बायोगॅसमुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. कारण सिलिंडरचा मासिक १००० ते १५०० इतक्या खर्चात बचत होत आहे. तसेच शेतीसाठी सेंद्रिय खत मिळून शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे. या बायोगॅस प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाढण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे. या दृष्टीने विविध प्रकल्प भविष्यात ही राबवले जातील असे मनोगत व्यक्त केले.
सिस्टीमा बायो कंपनीचे झोनल मॅनेजर अनिकेत शिंदे म्हणाले कि, सिस्टीमा बायो ही बायोगॅस निर्मिती मधील कंपनी असून जगभरातील वीस पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. सिस्टीमा बायो कंपनीचा भारतातील मुख्य कारखाना चाकण पुणे येथे आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही प्रमुख कार्यक्षेत्र असलेले राज्य आहेत. आज तागायात ५० हजार हून अधिक लाभार्थी आपल्या बायोगॅस युनिटचा लाभ घेत आहेत. कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रात सर्वात जास्त बायोगॅस बसवण्याच्या उच्चांक गोकुळने केला असून त्यासाठी सिस्टीमा बायो पुणे यांच्या वतीने गोकुळला ‘फ्लेम’अॅवार्ड देऊन सन्मानित करत आहोत असे सांगितले. या कार्यक्रमाचे स्वागत अनिकेत शिंदे यांनी केले तर आभार खुर्रम मुजावर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एन.डी.डी.बी (मृदा) चे अधिकारी आशितोष कोकणे, सिस्टीमा बायो कंपनीचे झोनल मॅनेजर अनिकेत शिंदे, गोकुळच्या महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, संपदा थोरात, खुर्रम मुजावर, विपिन काळे तसेच सिस्टीमा बायोचे अधिकारी, गोकुळच्या महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.