म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांकरिता प्रोत्साहनपर नवनवीन योजना राबविणार : चेअरमन अरुण डोंगळे ( १ जून जागतिक दुग्ध दिन व चेअरमन पदाची वर्षपूर्ती हा दुग्धशर्करा योग, हिरक महोत्सवी वर्षे संकल्पपूर्तीचे- दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे !!

कोल्हापूर ता.३१: कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हिरक महोत्सव वर्ष असून ते संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले असून गेल्या वर्षभरामध्ये माझ्या चेअरमन पदाच्या कारकिर्दी मध्ये दूध उत्पादका सोबतच गोकुळशी संग्लन सर्व घटकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला असून गतिमान प्रशासन व सूक्ष्म नियोजन यामुळे दूध संकलनाचा १८ लाखाचा टप्पा पार करता आला याचा मला आनंद आहे. ग्राहकांची म्हैस दुधाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार दूध पुरवठा व्हावा यासाठी म्हैस दूध उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोकुळ मार्फत आणखीन नवनवीन प्रोत्साहनपर योजना राबविणार असल्याचे चेअरमन अरुण ग. डोंगळे यांनी चेअरमन पदाच्या वर्षपूर्तीच्या व जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्याने सांगितले. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी गोकुळ परिवारातील दूध उत्पादक, ग्राहक,वितरक, कर्मचारी व संबंधित सर्वांना जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

      ‘वीस लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठणे, म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोत्साहन योजना, गोकुळच्या दुधासह अन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी मार्केटिंग यंत्रणा सक्षम करणे यावर भविष्यात लक्ष राहिल’ असे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी चेअरमनपदाची धुरा ज्येष्ठ व अभ्यासू संचालक अरुण डोंगळे यांच्याकडे सोपविली. डोंगळे यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला या आठवडयात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांनी वर्षभरात राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, व आघाडीचे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरू असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

      सन २०२३-२४ मध्ये गोकुळचे प्रतिदिन सरासरी म्हैस व गाय दूध मिळून १४ लाख ७० हजार ५४९ लिटर्स इतके संकलन झाले असून वर्षभरात दूध वाढ कार्यक्रमाअंतर्गत सर्व योजना प्रभावी पणे राबविल्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत जवळपास प्रतिदिनी अडीच लाख लिटर इतके दूध संकलन जास्त झाले. गोकुळच्या दूध विक्रीत वाढ झाली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रतिदिन सरासरी १३ लाख ९१ हजार लिटर्स दुधाची विक्री झाली आहे. रमजान ईदनिमित्त ११ एप्रिल २०२४ रोजी गोकुळच्या दुधाच्या विक्रीने उच्चांक गाठला. यादिवशी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली.

      संघातर्फे २०२३-२४ मध्ये म्हैस दूध खरेदीसाठी ५८ रुपये ५४ पैसे व गाय दुधासाठी ३८ रुपये ३७ पैसे इतका (जादा दर व दरफरक सहित) दिला. हा दर राज्यातील सर्वात जास्त गाय दूध खरेदी दर असून गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनापेक्षा ६ रुपये जादा दर दिला आहे. याचबरोबर   शासनामार्फत गाय दूध उत्पादकांना दिले जाणारे ५ रुपये अनुदान पोटी १४ कोटी ५८ लाख रुपये इतकी रक्कम दूध उत्पादकांना मिळाली आहे.

      “दूध उत्पादक आणि ग्राहक हे दोन्ही घटक ‘गोकुळ’साठी महत्वाचे आहेत. खरेदीदरात वाढ करताना ग्राहकांना विक्री दराची झळ बसू नये. याची दक्षता संचालक मंडळाने घेतली आहे. दूधवाढ व गुणवत्ता वाढीसाठी संचालक मंडळाने दूध उत्पादकांचे तालुकानिहाय मेळावे घेतले. व जातीवंत म्हैस खरेदी अनुदानात १० हजार रुपयाची वाढ केले याचा परिणाम म्हणून वर्षभरात २३७४ जातीवंत हरियाणा म्हैशींची खरेदी केली आहे. वासरु संगोपन योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये ११,८३६ जनावरांसाठी ८ कोटी ८१ लाख ८९ हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले. तसेच जवळपास १ कोटी ९५ लाख ४५ हजार ६८० इतकी रक्कम फिडींग पॅकेज अनुदानापोटी वाटप केले आहे.”

Ø सन २०२३-२४ या चेअरमन पदाच्या कारकिर्दीतील ठळक बाबी..

१. वार्षिक दूध संकलनामध्ये प्रतिदिनी सरासरी अडीच लाख लिटर दूध वाढ.

२. १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार.

३. ‘चेअरमन आपल्या गोठ्यावर’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या १२५ गोठयांना प्रत्यक्ष भेट.

४. मुंबई बरोबर पुणे मार्केटमध्ये ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध तसेच ‘गोकुळ पेढा’ ‘फ्लेव्हर मिल्क या नवीन उत्पादनाची निर्मिती तसेच बासुंदी व दही १ किलो व १० किलो पॅकिंग मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार उपलब्ध केले.

५. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरास आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली.

६. गोकुळ चे तूप व दही पुणे येथील सर्व डी मार्ट स्टोअर मध्ये उपलब्ध केले.

७. जातिवंत जनावरांसाठी ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ या नवीन पशुखाद्याची निर्मिती

८. कार्बन क्रेडीट बायोगॅस योजने अतंर्गत १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.कडून दूध उत्पादकांना गोकुळने उपलब्ध करून दिली.

९. गोकुळच्या नवी मुंबई वाशीतील नवीन दुग्ध शाळेचे उभारणी. (पॅकिंग खर्चात वार्षिक सरासरी रु.१२ कोटीची बचत होणार आहे.)

१०. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी (गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे.)

Ø धोरणात्मक निर्णय-

१. ‘गोकुळ श्री’ पुरस्कार रक्कमेत वाढ – प्रथम क्रमांकासाठी ३० हजार ऐवजी रुपये १ लाख.

२. म्हैस दूध वाढीसाठी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ३० हजार ऐवजी ४० हजार करण्याचा निर्णय.

३. वैरण कुटी साठी प्रती टन १ हजार रुपये अनुदान तर वैरण बियाणेसाठी ३५ % अनुदान.

४. कर्मचाऱ्याच्यासाठी सरासरी ५ हजार रुपये इतका वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार.

५. गोकुळ सलंग्न प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहन पर रक्कमेत प्रतिलिटर ५ पैसे वाढीचा निर्णय व अमंलबजावणी (वार्षिक १० ते ११ कोटी रुपये)

६. जनावरांचा भाकड काळ कमी करण्यासाठी वंध्यत्व निवारण शिबिरांचे यशस्वी आयोजन

७. गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम

८. वैरण बँक स्थापना – शिंदेवाडी ता.कागल व हसूरचंपू ता.गडहिंग्लज येथे

Ø भविष्यातील योजना-

१. भविष्यकालीन वेध घेत गोकुळ विस्तारासाठी भोकरपाडा-खोपोली येथे १५ एकर जागा खरेदी प्रस्तावित.

२. गडमुडशिंगी येथे आयुर्वेदिक औषध कारखाना निर्मिती व TMR प्लाँट विस्तारीकरण.

३. नवी मुंबई वाशी येथे १५ मे.टन क्षमतेचा दही प्रकल्प उभारणी व रेफ्रीजरेशन सिस्टिमचे विस्तारीकरण

४. ‘गोकुळ केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

——————————————————————–

      

                                                                          
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!