गोकुळची वाटचाल ही स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या विचारानेच : चेअरमन अरुण डोंगळे ( वर्गीस कुरियन यांना अभिवादन )
कोल्हापूर ता.२६: दुग्धक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जिल्ह्यातील दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मुर्तीना उजाळा देण्यात आला. यावेळी भारतीय संविधान प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले तसेच २६/११/२००८ च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यातील वीरमरण पावलेल्या शुर विरांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली ही वाहण्यात आली.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, दुग्ध क्रांतीचे जनक आणि डॉ. वर्गीस कुरियन यांची १०२ वी जयंती असून २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांनी नेहमीच सहकारी दुध संस्था मजबुतीकरणावर भर दिला. याकरिता त्यांनी नेहमीच गोकुळसारख्या संस्थांना मार्गदर्शन केले. गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉ.कुरियन यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असून त्यामुळेच गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे. डॉ.कुरियन यांचा ग्रामीण दुध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड विश्वास होता. त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना कायम ठेवली.असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक डॉ सुजित मिनचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुंरबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील डॉ.प्रकाश दळवी, डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.विजय मगरे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.