भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन करण्यात येणार अभिवादन : राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम होणार संपन्न : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. 1 :

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

यासंदर्भातील निदेश ग्रामविकास विभागाने ०१ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. यानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुखसमृध्दीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!