करवीर :
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सर्वांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडावा. यापूर्वी गावात मिरवणूक कार्यक्रमावेळी आलेल्या अडीअडचणी पाहता डॉल्बी लागणार नाहीत, रहदारीस अडथळा होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या. कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य, पोस्टर्स, देखावे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मंडळानी समाजोपयोगी गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी केले.
करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंडजवळ कोल्हापूर येथे आयोजित गणेशोत्सव शांतता बैठक व रक्तदान शिबिर कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होत्या. यावेळी एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावांचा झाडांची रोपे, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गणपती परवाना अर्ज वाटप करण्यात आले. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयकरिता 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी परि. सहा. पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी मंडळा मंडळामध्ये चांगल्या समाजोयोगी स्पर्धा कराव्यात, आपसात वाद व अवास्तव खर्च टाळावा. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रितसर सर्व विभागांची परवानगी घ्यावी, श्री गणेश मूर्तीजवळ २४ तास स्वयंसेवक हजर ठेवावेत आदी सूचना करून कायद्याचे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.
प्रास्ताविक करवीरचे पोलीस उपनिरीक्षक
जालिंदर जाधव यांनी तर सूत्रसंचालन व नियोजन गोपनीय अंमलदार अविनाश पोवार व सुहास पोवार यांनी केले. यावेळी सामाजिक वनीकरण अधिकारी श्री.शिंदे, ठाणे हद्दीतील सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यक्ती, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस हवालदार राहुल देसाई यांनी आभार मानले.