या गावात सापडला ऐतिहासिक ठेवा : अतिप्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना
कोल्हापूर :
वाकरे ता.करवीर येथे एक ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. अतिप्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे गावतळे आहे. काटकोनात जांबा दगडांमध्ये चारी बाजूने पायर्यांचे भक्कम बांधकाम आहे. पाण्याचे पाझर, तळ्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक बाजूला ३ मोऱ्या आहेत, अडीच बाय पाच अशा सुंदर बांधकामात दिसणाऱ्या व कल्पना युक्त मोऱ्या आहेत . शेवटी घाट असून, मध्यभागी छोटेसे मंदिर आहे. यामध्ये महादेवाची पिंड आहे, असे जाणकारांचे मत असून हे सर्व बांधकाम बाराव्या शतकातील असावे,आणि हे सर्व बांधकाम उत्कृष्ट स्थापत्य बांधकामाचा नमुना आहे.

या पुरातन ऐतिहासिक बांधकाम असलेल्या गाव तळ्याने मोकळा श्वास घेतला आहे. चहूबाजूंनी काटकोनात पायर्यांचे बांधकाम आणि मध्यभागी मंदिर असून कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलाव, यमाई, कात्यायनी ,मणिकर्णिका कुंडाप्रमाणे बांधकाम असल्याने सुमारे बाराव्या शतकातील हे गावतळे असावे, असे अंदाज ग्रामस्थ व जाणकारांच्या तुन व्यक्त होत आहेत. गाव तळ्याचा गाळ पहिल्यांदाच काढण्यात येत असल्याने तळ्यात आणखी कोण कोणत्या वास्तू आणि बांधकाम सापडेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गाव तळ्यातील गाळ काढल्याने सुमारे पन्नास एकरातील शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुन समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी अनेकदा गाव तळ्याचा गाळ काढण्याचा प्रयत्न झाला मात्र तो असफल ठरला. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी, गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौर योजनेतून निधी दिला.हा सौर प्रकल्प करताना गाळ काढण्यास सुरुवात झाली, सरपंच वसंत तोडकर यांनी अथक प्रयत्न करून, स्व खर्च घालून गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. गेली एक महिना ग्रामस्थ, तरुण मंडळे,तरुण गाळ काढण्यासाठी मदत करत आहेत. त्यासाठी कुंभी कारखाना संचालक संजय पाटील यांचे सहकार्य मिळाले असून रणजीत पाटील साबळेवाडी, तुषार मोरे, राम येरुडकर ,पाटलू पाटील,यशवंत माळी,राहुल चोगले ,विलास तोडकर यांनी गाळ काढण्यासाठी,साहित्य मशनरी दिल्या आहेत. अमर पाटील शिंगणापूर यांनी गाळ काढण्यासाठी पाच लाख रुपये जाहीर केले आहेत.
निवास पाटील, एस. के. पाटील,के.डी. माने, संजय पाटील, नितीन पाटील( सावकर )या शेतकऱ्यांनी स्वतःचा उभा उस कापून गाळ टाकण्यासाठी शेत दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे . उपसरपंच शारदा पाटील, माजी उपसरपंच कुंडलीक पाटील, सर्व सदस्य, ग्रामसेवक संभाजी पाटील, यांचे सहकार्य मिळत आहे. ऐतिहासिक वास्तु जपण्यासाठी तरुणांकडून बांधकामाची मोडतोड होऊ नये यासाठी पाण्याच्या दाबाने पायऱ्यांची व बांधकामाचे स्वच्छता करण्यात येत आहे.
===============
प्रा.एस. ए. पाटील सर…
सुमारे ६१ गुंठ्यात गाव तळे असून काटकोनात जांबा दगडांमध्ये चारी बाजूने पायर्यांचे भक्कम बांधकाम आहे. पाण्याचे पाझर, तळ्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक बाजूला ३ मोऱ्या आहेत, अडीच बाय पाच अशा सुंदर बांधकाम दिसणाऱ्या व कल्पना युक्त मोऱ्या आहेत . खाली घाट असून, मध्यभागी छोटेसे मंदिर आहे. यामध्ये महादेवाची पिंड असून हे सर्व बांधकाम बाराव्या शतकातील असावे ,आणि हे सर्व उत्कृष्ट स्थापत्य बांधकामाचा नमुना आहे. यावरून पूर्वीच्या लोकांची समृद्धी असल्याचे समजते. ही ऐतिहासिक वास्तू असून,ही जपली पाहिजे. या पुरातन वास्तूचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
वसंत तोडकर, सरपंच
वाकरे…
सुमारे १५ हजार ट्रॉली गाळ काढला आहे, गाव तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ६० लाखांची गरज आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सरोवर संवर्धन योजनेतून एक कोटीचा प्रस्ताव दिला आहे. गाळ काढताना तळ्यात लाकडी घाण्याचे अवशेष, ब्रिटिश कालीन नाणी, बि.डी पैसा, होल असलेला पैसा, १९४४ ची नोंद असलेली नाणी सापडत आहेत.