एक गाव एक गणपती : सावर्डे दुमाला गावची २९ वर्षांची अखंडीत परंपरा, एकदाही साउंड सिस्टीम वाजला नाही
करवीर :
सावर्डे दुमाला तालुका करवीर गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’
सार्वजनिक उत्सवाची परंपरा २९ व्या वर्षीही कायम राहिली आहे. आतापर्यंत एकदाही या उत्सवात साउंड सिस्टीम वाजलेला नाही. पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरा होणारा हा उत्सव अन्य गावांना अनुकरणीय असाच असून सावर्डे दुमाला गावचा आदर्श वाखणण्याजोगा ठरला आहे.
गावागावांत असणारे गटतट, विविध पक्ष, अनेक संस्थांचे जाळे, गल्लोगल्ली असणारी मंडळे, त्यांच्यातील ईर्षा, नानाविध मतप्रवाहाचे लोक अशा बऱ्याच तऱ्हा पाहता गावातील गावातील सर्व घटकांनी एक विचाराने एकत्र येऊन सामाजिक सलोखा व एकोपा कायम राखत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मात्र सावर्डे दुमाला गावाने सलग २९ व्या वर्षीही ही परंपरा कायम राखली आहे.
जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाने सर्वप्रथम १९९५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत गावात ‘ एक गाव एक गणपती ‘ ची परंपरा अव्याहतपणे चालू आहे आहे. गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान गावातील अनेक मंडळांकडून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव काळात सकाळ – संध्याकाळी सार्वजनिकरित्या गणेश आरती होते. या आरतीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
गणेश आगमन असुदे अगर विसर्जन मिरवणूक असुदे एकदाही साउंड सिस्टीम दणानला नाही. दरवर्षी भजन, झांज पथक, धनगरी ढोल, लेझीम, मर्दानी खेळ आदी पारंपरिक वाद्याचाच वापर होत आहे. यावर्षी गणेशाचे आगमन गावातीलच शिव छावा मर्दानी आखाड्याच्या पारंपरिक खेळाच्या सादरीकरणातून झाले. यावर्षी रघुनाथ भोसले व एकनाथ खाडे यांनी गणेशमूर्ती दिली आहे.