कुंभी कासारी साखर कारखान्याची :
संपूर्ण एफआरपी अदा
अध्यक्ष आ. चंद्रदीप नरके यांची माहिती
करवीर :
कुंभी कासारी साखर कारखान्याने हंगाम २०२०/२१ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण उसाची ३ हजार ११९ रूपये प्रतिटन प्रमाणे एफआरपी
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली असल्याची माहिती अध्यक्ष आ. चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले कुंभी कासारी साखर कारखाना हंगाम 2021 मध्ये ५ लाख ५० हजार ६१५ मे.टन उसाचे गाळप केले आहे. १२.६९ टक्के सरासरी साखर उताऱ्यासह यावर्षी ५ लाख ९८ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपी १७१ कोटी ७३ लाख ६९ हजार ८१६ रूपये होत आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ही संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे.जिल्ह्यातील हा उच्चांकी ऊस दर आहे असे अध्यक्ष नरके यांनी सांगितले.
सलग दोन वर्षे अतिरिक्त साखर उत्पादन, कोरोना महामारी यामुळे साखरेला उत्पादन खर्चा एवढाही दर मिळत आहे. साखरेच्या हमी भावाप्रमाणे दर मिळत नसल्याने गोडाऊन मध्ये यावर्षीची साखर शिल्लक आहे. याचा परिणाम आर्थिक कोंडी होत असल्याने साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. त्यातच सध्या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी राजस्थान हरियाणा गुजरात दिल्ली या राज्यातील बाजारपेठ काबीज केली आहे. पण ऊस उत्पादकांचे हीत समोर ठेवून उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कुंभी कासारीने कायम ठेवल्याचे सांगितले.
हंगाम २०२१/२२ साठी सहा लाख मे.टन ऊसाचे गाळप उदिष्ट ठेवले आहे. तरी कार्यक्षेत्रातील सभासद बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पीकवलेला संपूर्ण ऊस कुंभीला पुरवठा करावा असे आवाहन अध्यक्ष नरके यांनी केले आहे.