गोकुळने गायीच्या दुधाचा दर वाढवून द्यावा :
बहिरेश्वर, म्हारूळ येथील दूध उत्पादकांचा उद्रेक, आज गोकुळला देणार निवेदन
करवीर :
करवीर तालुक्यातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या बहिरेश्वर, म्हारूळ येथील दूध उत्पादकांमध्ये गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात कपात केल्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे. बहिरेश्वर येथे दूध उत्पादकांनी गावातील चौकात एकत्र येत गोकुळच्या दूध दर कपातीचा निषेध करून गायीच्या दुधाला दर वाढवून मिळालाच पाहिजे, असा निर्धार केला. यासंदर्भात या गावातील सभासद आज मंगळवारी (दि. ३) गोकुळ प्रशासनाला निवेदन देणार आहेत.
दरम्यान रात्री म्हारूळ येथील सर्व दूध संस्थेच्या सभासदानी कसबा बीड येथे राजेंद्र सूर्यवंशी यांच्या घरी बैठक घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी बैठकीत उत्पादकांनी, लंपीमुळे आधीच उत्पादक बेजार झाला आहे. गावातील अनेकांच्या चांगल्या गाई दगावल्या पण गोकुळने काहीच नुकसान भरपाई दिली नाही. अमूल दूध संघ गायीच्या दुधाला चांगला दर देते मग तुम्ही का देत नाही. दूध दर कपातीने बहिरेश्वर गावचा वर्षाला ८० लाखाचा तर म्हारूळ गावचा वर्षाला ५० लाखाचा तोटा होणार आहे.
तीन महिण्यात गोकुळने गायीच्या दुधात दोनदा कपात करून ४ रुपये कमी केले आहेत. सगळा बोजा उत्पादक सभासदावरच का?. अशा पद्धतीने गोकुळ २० लाख लिटर चे लक्ष्य गाठेल काय? दूध उत्पादक अडचणीत असताना गोकुळने त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे होते, मात्र असे होताना दिसत नाही. गोकुळने लंपीने मयत झालेल्या जनावरांना १० हजार अनुदान द्यावे तसेच गायीच्या दूध दरात एकूण ५ रुपये प्रमाणे वाढ करून द्यावे अशी आक्रमक भूमिका मांडली. निवेदनानंतर गोकुळ सकारात्मक निर्णय नाही घेतला तर पुढचा निर्णय घेऊ इशाराही यावेळी देण्यात आला.