डायलिसिस करावे लागते, ही माहिती वाचा
सीपीआर मध्ये असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी आता डायलिसिस सेवा उपलब्ध
कोल्हापूर :
येथील सीपीआर रुग्णालयात असाध्य आजाराच्या रुग्णांनाही डायलिसिस सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ताबडतोब काही अडचणींचे निराकरण करुन एचआयव्ही, काविळचे रुग्ण यांच्याकरिता डायलिसिस सुविधा सुरु करण्यात आली आहे.
येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजच्या अधिपत्याखाली डायलेसिस विभाग कार्यरत आहे. मनुष्यबळाची कमतरता तसेच काही तांत्रिक उणिवा यामुळे असाध्य आजारांवर डायलेसिस होऊ शकत नव्हते. यावर अनेक सामाजिक संस्थांनी आवाज उठवला होता. तसेच एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ताबडतोब अडचणींचे निराकरण करून या सोयी इतर रुग्णांबरोबरच असाध्य आजाराच्या रुग्णांनाही उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता सीपीआर हॉस्पिटल येथे एच आय व्ही , काविळचे रुग्ण यांच्याकरिता डायलिसिस सुविधा सुरु करण्यात आली आहे. याकरिता स्वतंत्र मशीन राखीव ठेवून प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका व डायलेसिस विभाग प्रमुख डॉ. अनिता परितेकर यांनी दिली.