चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : संभाजीराजे छत्रपती (‘ गाव टू गाव’ प्रचाराचा झंझावात)
चंदगड :
निसर्गाचे वरदान लाभलेला चंदगड तालुका आहे. पर्यटनाच्यादृष्टीने या तालुक्याच्या विकास करण्याबरोबरच इथल्या गडकोटांचे संरक्षण करण्याचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. तो आम्ही प्रत्यक्षात उतरवू. महाराज जेव्हा लोकसभेत असतील त्यावेळी त्यांचा शब्द प्रमाण मानून ते मागतील ती गोष्ट मिळेलच.चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, यासाठी सर्वांनी मनापासून साथ द्या , असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती यांचा शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘ गाव टू गाव’ प्रचाराचा झंझावात सुरु आहे. चंदगड तालुक्यातील प्रचार दौऱ्यात नागनवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधतना ते बोलत होते. यावेळी पांडुरंग गावडे यांच्या हस्ते छत्रपती युवराज संभाजी राजे यांचा सत्कार करण्यात आला.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, चंदगड तालुका सर्वार्थाने समृध्द असला तरी भौतिक सोयी सुविधांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला आहे. या मतदारसंघातील खासदारांचे दुर्लक्ष झाल्याचे आम्हाला लोक सांगतात. लोकांच्या सूचना मी समजून घेत आहे. दररोज १५ ते २० गावातील लोकांशी सुसंवाद साधत आहे. त्यांना काय हव आहे, याचा मी अभ्यास करत आहे. चंदगड तालुक्यात खूप काही करता येण्यासारखे आहे. इथल्या इथे प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते. हॉटेल व्यवसायात चंदगड तालुक्याची संपूर्ण राज्यात स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून इथे हॉटेल व्यवसायातून क्रांती घडू शकते. दळणवळणाच्या सोयी अधिक हायटेक करावयाच्या असून त्यासाठी आपला पाठपुरावा असेल.
‘गाव टू गाव’ माझा प्रवास सुरू झाला आहे. ७०० ते ८०० गावांना प्रत्यक्ष भेटी देण्याचा आपला संकल्प असून आत्तापर्यंत तीनशे गावांना भेट दिली आहे. लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद असून निवडणूक केवळ औपचारिक बाब आहे. यश आमचेच आहे. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. तो आमचा स्वभाव नाही. महाराजांनी महाराजांसारखेच वागायचं असतं. समोरच्या माणसाने पातळी सोडली तरी आपण ती सोडून चालत नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार परिवर्तन घडवतील, याबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नाही.
प्रास्ताविक प्रा. राम गावडे यांनी केले. प्रा. गोपाळ गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णुपंत जोशीलकर, दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील, चंद्रशेखर गावडे, नारायण गावडे, ‘ स्वराज्य ‘ अध्यक्ष संजय पवार, प्रा. आर. पी. पाटील, शांताराम गुरबे, विक्रम मुतकेकर आदीची उपस्थिती होती. प्रा. सुभाष गावडे यांनी आभार मानले.