आमदार ऋतुराज पाटील
कोल्हापूर ता१०:
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात शेणी लागतात. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून लोकसहभागातून पंचगंगा स्मशानभूमीला येत्या काही दिवसात एक लाख शेणी देणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. कोरोना संकट काळात सर्व गट -तट, पक्ष बाजूला ठेवून आपण ‘माणूसकी ‘म्हणून या कामात सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात आ.ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदार संघातील सर्व गावातील सरपंचांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. या पत्रामध्ये आमदार पाटील यांनी म्हटले आहे की,
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच कोविड सेंटर मध्ये मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. या मध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णाचे मृतदेह सुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुलनेने ज्यादा शेणी लागतात. या शेणी विकत विकत घ्यायचे म्हटले तरीसुद्धा जे शेणी पुरवठादार आहेत त्यांच्याकडून त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपणा सर्वांच्या सहकार्याने आपल्या गावातून शेणी गोळा करुन पंचगंगा स्मशानभूमीला देणे ही काळाची गरज आहे.
यासाठी आपण आपल्या गावातील सर्व संस्था आणि तरुण मंडळे ,महिला बचतगट यांच्या सहकार्याने आपल्या गावातून जास्तीत जास्त शेणी गोळा करून त्या स्मशानभूमीला द्याव्यात. अडचणीच्या काळात आपण केलेली ही मदत माणुसकीचा धागा घट्ट करणारी ठरणार आहे .होळी वेळी प्रत्येक घरासमोर किमान पाच शेणीची होळी केली जाते ,तरुण मंडळाकडून मोठी होळी केली जाते. आता या अडचणीच्या काळात प्रत्येक घरातून नक्की किमान पाच शेणी मिळू शकतात. त्यासाठी गावपातळीवर लोकांना याची माहिती देणे, प्रबोधन करणे गरजेचे आहे .तरुण मंडळानी या कामासाठी पुढे यावे . शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे, असे भावनिक आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.