(फोटो ट्विटरवरुन )
मुंबई :
जवद चक्रीवादळासंदर्भात
ओडिशा सरकारने इशारा दिला आहे. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावे असे आदेश दिले आहेत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून या चक्रीवादळाचा जवद असे नाव देण्यात आले आहे. जवद हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे.
येथे आपत्कालीन परिस्थितीन निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होम्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी पहाटच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यात आहे.
हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.