गोकुळ चेअरमन पदी विश्वास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा
कोल्हापूर :
बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत
विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले. या यशानंतर आता नूतन अध्यक्ष पदी कुणाची निवड होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून अध्यक्ष पदासाठी विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अरुण डोंगळे यांच्या नावालाही पसंती मिळू शकते.
गोकुळच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून सत्ताधाऱ्यांचे पानिपत केले. या विजयाचा मार्ग सत्ताधारी गटातून बाहेर पडून विरोधी गटात सामील झालेले विश्वास पाटील (आबाजी) व अरुण डोंगळे यांच्यामुळे सुकर झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
गोकुळच्या राजकारणात आबाजी हे मुरब्बी आहेत. महादेवराव महाडिक यांच्याशी वितुष्ट आल्यानंतर करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांचे घनिष्ट असतानाही त्यांना सोडून आबाजी यांनी या निवडणुकीत
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे असलेल्या ठरावाच्या गठ्ठयामुळे व जोडण्यामुळे गोकुळमध्ये परिवर्तन करण्यास पालकमंत्री पाटील यांना निर्णायक मदत झाली आहे.
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत विश्वास पाटील (आबाजी) हे ज्येष्ठ, अनुभवी संचालक आहेत. दोन वेळा चेअरमन म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे. यावेळी ते सातव्यांदा संचालक म्हणून गोकुळमध्ये निवडून आले आहेत. त्यामुळे नूतन चेअरमन पदासाठी विश्वास पाटील (आबाजी) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.