‘गोकुळ’ निवडणूक : चुरशीने मतदान : दोन्ही पॅनेलकडून शक्तिप्रदर्शन
कोल्हापूर :
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज चुरशीने ९९.७८ टक्के मतदान झाले.
आमदार पी.एन.पाटील , माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी अशी अतिशय अटीतटीची व कमालीची निवडणूक आज संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळाली.
प्रत्येक मतदान केंद्रावर दोन्ही आघाडीच्या नेते व उमेदवार यांचेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत गठ्ठा मतदान करण्यावर भर दिलेला पाहायला मिळत होता.
दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आकडेवारीवरून निकालाचे अंदाज बांधण्यात दोन्ही गटातील कार्यकर्ते दंग आहेत. प्रत्येक तालुक्यात मतदान किती, झाले किती ,आपल्या पॅनेलला किती, त्यांच्या पॅनेलला किती ? याची आकडेमोड केली जात आहेत.
गोकुळच्या निवडणुकीसाठी आज चुरशीने ९९.७८ टक्के मतदान झाले असून दोन्हीकडून विजयाचा दावा केला जात आहे. मागील निवडणुक पाहता यावेळी दिग्गज नेते व उमेदवार निवडणुकीत उतरल्याने चुरस शिगेला पोहचली होती. त्यामुळे निकालाची प्रचंड उत्सुकता जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रात निर्माण झाली आहे.