कुस्ती व पोलीस भरतीत प्रावीण्य मिळविणाऱ्या मल्लास रोख रकमेसह तूप बक्षीस
कोल्हापूर :
कोगे गाव हे कुस्तीवर प्रेम करणारे गाव. मात्र
कुस्ती व अन्य मैदानी खेळांचा ओढा कमी होऊ लागला आहे तसेच आजकाल स्पर्धा परीक्षांना सामोरे न जाता अनेक तरुण पोस्टरबाजी आणि राजकारणात वेळ घालवत आहे. यामुळे युवक-युवतींचे करियर खराब होत आहे. गावातील जास्तीत जास्त युवक – युवतींनी कुस्तीकडे वळावे, मैदानावर रमावे तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन चांगले यश प्राप्त करावे यासाठी कुस्ती क्षेत्रातील वस्ताद विलास दत्तात्रय मांगोरे यांनी कोगे (ता.करवीर) येथील युवक-युवतींसाठी प्रोत्साहनपर रोख रकमेसह ,शारीरिक तंदुरुस्तीसाठी तूपही बक्षीस म्हणून जाहीर केले आहे.

कुस्ती क्षेत्रातील वस्ताद पै. विलास दत्तात्रय मांगोरे यांनी हे एका खाजगी कंपनीत काम करतात. परिस्थिती बेताची असतानाही केवळ आणि केवळ गावात कुस्ती वाढावी यासाठी ही अनोखी बक्षिसे लावली आहेत.
कोगे गाव मर्यादित असणाऱ्या या बक्षिसांमध्ये मल्लविद्येला चालना देण्यासाठी कुंभी कारखाना मानधनधारक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने येणाऱ्या मल्लाला एक महिना एक लिटर दूध व दोन किलो तूप देऊ, गावातील महाराष्ट्र पोलीस होणाऱ्या तरुणाला किंवा मल्लासाठी पंधराशे एक रुपये रोख व दोन किलो तूप देऊ , गावातील युवती महाराष्ट्र पोलीस झाल्यास दोन हजार रुपये रोख व दोन किलो तूप देऊ, कुमार कामगार केसरी होणाऱ्या मल्लाला दोन हजार रुपये रोख व दोन किलो तूप तसेच महाराष्ट्र केसरी होणाऱ्या मल्लास २५ हजार रुपये रोख व जाहीर सत्कार असे स्वरूप आहे.
एका खाजगी कंपनीत काम करत, अल्पभूधारक शेतकरी असून घरची परिस्थिती बेताची असताना, गावातील युवक युवतींसाठी आपले चार पगार त्यांनी देऊ करून ही बक्षिसे जाहीर केली आहेत. गावातील कुस्ती कलेला व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी वस्ताद मांगोरे यांनी जाहीर केलेल्या या अनोख्या बक्षीस प्रयोगाचे,
त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे .
कोगे गावात दोन तालीम होत्या आणि घरोघरी मल्ल होते . सध्या मात्र बोटावर मोजण्याइतके मल्ल राहिले आहेत. तरुण राजकारण व पोस्टरबाजीमध्ये अडकू लागले आहेत. या प्रकाराला फाटा देण्यासाठी,
गावात घरोघरी मल्ल तयार व्हावा, गावातील युवक युवतींनी स्पर्धा परीक्षाकडे वळावे व करिअर करावे , यासाठी ही प्रोत्साहनपर बक्षिसे जाहीर केली आहेत.
—- पै. विलास दत्तात्रय मांगोरे, वस्ताद