फोटो – ट्वीटर हँडल केंद्रीय हवामान विभाग
Tim Global :
यास आणि तौक्ते चक्रीवादळांनंतर आता पुन्हा एकदा भारतीय किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ धडकणार आहे. केंद्रीय हवामान विभागानं ही माहिती दिली असून संध्याकाळच्या सुमारास ते ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दरम्यान भारतीय किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच, चक्रीवादळाचा संभाव्य तडाखा बसल्यानंतर तातडीने काम सुरू करण्यासाठी बचावपथकं देखील सज्ज झाली आहेत. २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दरम्यान भारतीय किनारी भागात धडकलं होतं. तर तौक्ते चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकलं होतं.
गुलाब चक्रीवादळ ओडिशामधील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशमधील कलिंगपटनम या जिल्ह्यांच्या किनारी भागात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार हे दोन्ही जिल्हे आणि आसपासच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील संभाव्य प्रभावित क्षेत्रामधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.