फोटो प्रातिनिधिक
कोल्हापूर :
एखादा बालविवाह होत असेल तर या बालविवाहामध्ये उपस्थित सर्व (उदा. मंगल कार्यालयाचे मालक, भटजी, कॅटरर्स, इतर नातेवाईक ) यांच्यावर गुन्हा नोंद करावा. मंगल कार्यालयात विवाह करण्याआधी मंगल कार्यालयाच्या मालकांनी मुलीचे व मुलाचे वय पूर्ण आहे का ? याची खात्री करूनच विवाह करण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
चाईल्डलाईन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 8 एप्रिल रोजी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ग्रामीण भागामध्ये बालविवाह झाल्यास गावातील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्राम बाल संरक्षण समितीचे सर्व सदस्य जबाबदार राहतील. तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनीही बालविवाह होऊ नये याबाबतची जबाबदारी त्यांच्यावर राहील. शहरी भागामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, नगरसेवक, अंगणवाडी सेविका हे जबाबदार राहतील. बालविवाह घडल्याचे आढळल्यास या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे १०९८ या मोफत नंबरचा सर्व लोकांनी वापर करावा. जे कोणीही फोन करणार त्या व्यक्तीचे नाव व सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. बालविवाह संबंधी जिल्हा पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच ग्राम बाल संरक्षण समितींना “बाल योद्धा” हा पुरस्कारही देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.