कोल्हापूर :
८ मार्च जागतिक महिला दिन
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने ज्येष्ठ संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली व संचालिका उदयानीदेवी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळाही संपन्न झाली.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निगवे दुमाला येथील राजलक्ष्मी महिला बचत गट, कबनूर येथील जिजामाता महिला बचत गट व संस्कृती महिला बचत गट, कोल्हापुरातील प्रिन्सेस पद्माराजे महिला बचत गट, पद्माराजे उद्यान महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट तसेच पारगाव येथील संघर्ष महिला बचत गट या बचत गटांना दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांनी, केडीसीसी बँक महिलांच्या विकासाला नेहमी चालना देत आली आहे. जास्तीत जास्त महिलांचे
आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी बँकचे सदैव पाठबळ राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
संचालिका श्रीमती उदयानीदेवी साळुंखे म्हणाल्या, नवनवीन उद्योग उभारणीसाठी महिलांनी प्रयत्न करणे आवश्यक असून , जर उद्योग उभारणीतून स्वावलंबनासाठी महिला जर दोन पाऊल पुढे आल्या तर बँक त्यांच्या सहकार्यासाठी चार पावले पुढे येऊन सहकार्य करेल. महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी मनोगतात बँक महिला बचत गटांना योग्य ते सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रारंभी स्वागत शेती कर्जे विभाग उपव्यवस्थापक अजित जाधव तर प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या उपव्यवस्थापक रंजना स्वामी यांनी केले. प्रशासन विभाग व्यवस्थापक जी.एम.शिंदे यांनी आभार मानले. कार्यशाळेस महिला बचत गट कार्यकर्त्या उपस्थित होत्या.