खते आणि बियाण्यांचे लिंकिंग : होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी

पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर :

नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधार किंमत मिळण्यासाठी पणन मंडळामार्फत खरेदीचे मोहीम राबविण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव तयार करावा. त्याच बरोबर खते आणि बियाण्यांचे लिंकिंग होणार नाही याबाबतही दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. पाटील, आमदार अरुण लाड, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपसंचालक भाग्यश्री पवार उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाकुरे यांनी संगणकीय सादरीकरण करुन जिल्ह्याची सविस्तर माहिती दिली. यात सर्वसाधारण माहिती, पर्जन्यमान, उत्पादन, खते व बियाणे, खरीपकरिता बियाणे मागणी व गरज, खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा, शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे‍ मिळण्याकरिता गुणवत्ता  नियंत्रण, मृदा आरोग्य पत्रिका, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, हुमणी किड व्यवस्थापन, काजू पीक संरक्षण कार्यक्रम याचा समावेश होता.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीची प्रक्रिया करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवावा. जेणेकरुन त्याचा शेतकऱ्यांना फायदा हाईल. त्याचबरोबर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बियाणांबाबत लिंकिंग होणार नाही याबाबत कृषी विभागाने आतापासूनच दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची नोंद घेवून त्या प्रमाणे कार्यवाही करावी. खते, बियाणे, युरिया वेळेवर मिळण्याबाबत नियोजन ठेवावे.
आमदार श्री. लाड म्हणाले, ठिबकची गती वाढवावी. त्याचबरोबर सोयाबीनचे बियाणंही वाढवावं. आमदार श्री. पाटील म्हणाले, खतासाठी प्रयत्न करुन त्याबाबत बफरस्टॉक झाला तर शेतकऱ्यांच्या बांधावर खते देणे सोयीस्कर होईल. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करुन शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती द्यावी. चहा, कॉफी उत्पादनाबाबतही नियोजन करुन त्याचीही माहिती शेतकऱ्यांना द्यावी.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, विकेल ते पिकेल हा कृषी विभागाचा उपक्रम अभिनंदनीय आहे. या अभियान अंतर्गत कसबा बावडा येथे एका अपार्टमेंटमध्ये आलेले अधिकारी आणि शेतकऱ्यांशी मी चर्चा केली. शेतकऱ्याच्या भाजी पाल्याला चांगला दर मिळत आहे आणि ग्राहकाला देखील ताजा भाजीपाला मिळत आहे. आपल्या गावातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्याला त्रास होणार नाही त्याची सोय व्हावी यासाठी कृषी विभागाच्यावतीने ओळखपत्र द्यावे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, पणन मंडळामार्फत भात खरेदीची मोहीम जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ऊस पिकात  अंतर पीक घेणाऱ्या नाचणीसाठीही मोहीम राबविल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, शिवाय जनावरांना वैरणही उपलब्ध होईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!