गोकुळने गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करावेत : बीडशेड येथील दूध उत्पादकांच्या बैठकीत आग्रही मागणी
करवीर :
बीडशेड (ता.करवीर) येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज हॉल येथे गोकुळ दुध संघाने गायीच्या दुध दरात केलेल्या कपातीच्या विरोधात दूध उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या यां बैठकीत गोकुळने गायीच्या दुधाचे दर दिवाळीपूर्वी पूर्ववत करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, गाय दूध दरात ४ रुपये कपात गोकुळने केल्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. दिवाळी पूर्वी गाय दूध दर पूर्ववत करून उत्पादकांची दिवाळी गोड करावी. अन्य संस्थाकडे युवकांचा ओढा वाढू लागला आहे. भविष्यातील धोके ओळखून अडचणीतील सभासदांना न्याय द्यावा, असे सांगून राजेंद्र सूर्यवंशी यांनी अमूल व गोकुळ दूध संघाच्या म्हैस व गाय दूध दरातील तफावत मांडली.
बहिरेश्वर येथील युवक दूध उत्पादक बबलू चौगले म्हणाले, नोकरी नाही म्हणून बँकेत कर्ज प्रकरण करून जनावरे घेतली. बँकेचे हफ्ते भागवून कसेबसे चार पैसे उरतात त्यातून संसार चालवतो. पण गोकुळ दुध संघाने गाय दूध दरात कपात तर पशूखाद्य दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे माझ्यासारख्या हजारो तरूण आर्थिक संकटात सापडलो आहे.
प्रा.टी.एल.पाटील म्हणाले, दूध व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो संसाराचे गाडे सुरू आहेत. हा व्यवसाय करताना गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी, समस्या येत आहेत. त्यामुळे गायीच्या दुधाचे दर कमी करणे ही काय व्यवहार्य बाब नाही. वाढती महागाई पाहता सभासदांना चांगला दर मिळालाच पाहिजे.
या बैठकीला शामराव सूर्यवंशी, बळीराम पाटील (मांडरे), सर्जेराव पाटील, रघुनाथ पाटील (खांटागळे), विलास चौगले (पासार्डे), नामदेव एकल, बाबुराव जाधव, अमर खाडे,शरद चौगले,सागर पाटील (बहिरेश्वर)आदीसह दूध उत्पादक सभासद, युवक उपस्थित होते.
यावेळी जगदीश पाटील (महेकर), शिवाजी पाटील (म्हारुळ), विजय पाटील (पाडळी), उदय साळवी, संजय पाटील बाचणी, यांनी भाषनात दूध उत्पादकांच्या व्यथा मांडून दूध दर वाढवून देण्याची मागणी केली.