भोगावती साखर कारखाना : चेअरमनपदी प्रा. शिवाजीराव पाटील, व्हा.चेअरमन पदी राजाराम कवडे
कोल्हापूर :
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील (देवाळेकर) यांची तर व्हा. चेअरमन पदी राजाराम शंकर कवडे ( आवळी बुद्रुक ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरला अध्यक्ष पद तर राधानगरीला व्हा. चेअरमन पद देऊन समतोल साधला गेला आहे. कारखाना कार्यस्थळावर निवडणूक अधिकारी निलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांच्या झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे संपतराव पवार, गोकूळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या आघाडीने झालेल्या निवडणुकीत २५ पैकी २४ जागा जिंकून मोठे यश प्राप्त केले. त्यानंतर चेअरमन पद कुणाला मिळणार याची चर्चा रंगू लागली होती. चेअरमन पदासाठी करवीरमधून अनेकांची नावे चर्चीली गेली. अखेर चेअरमन पदासाठी प्रा. शिवाजीराव पाटील यांचे नाव आमदार पाटील यांनी अंतिम केले. व्हा चेअरमन पद ए.वाय. पाटील यांच्या गटाला देण्याचे ठरल्यामुळे या पदावर राजाराम कवडे यांचे नाव निश्चित करण्यात आले.आर्थिक संकटातील कारखाना सावरण्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्याना कसब पणाला लावावे लागणार आहे.
निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.