‘ भोगावती ‘ वर आमदार पी. एन. पाटील यांचाच दबदबा : २४ -१ असा दणादणीत विजय
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहूचर्चित भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार पी.एन.पाटील यांचाच दबदबा कायम असल्याचे स्पष्ट झाले. सभासदांनी पुन्हा आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेललाच पसंती दिली आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने २५ पैकी २४ जागा मोठ्या फरकाने जिंकत दणादणीत विजय मिळविला. विरोधी दोन्ही आघाडीचा दारुण पराभव झाला. संस्थापक कौलवकर पॅनेलचे प्रमुख धैर्यशील पाटील यांना मात्र स्वतः जिंकून येण्यात यश मिळाले.
भोगावती साखर कारखान्याचा निवडणूक बिगुल वाजल्यापासून बिनविरोधची चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा मागे पडून निवडणुकीसाठी पॅनेल बांधणीला वेग आला. राजकीय कसब वापरून आमदार पी. एन. पाटील यांनी भक्कम पॅनेल उभा केले. सत्ताधारी गटाचे नेतृत्व आमदार पी एन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू, कृष्णराव किरुळकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी पॅनेल प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली.
सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडी विरुद्ध
संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर पॅनेल विरुद्ध शिवशाहू परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. सत्ताधारी गटाने विरोधी दोन्ही पॅनेलचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर पॅनेलचे प्रमुख माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर विरुद्ध उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांच्यातील रंगत शेवटपर्यंत सुरू होती. मात्र धैर्यशील पाटील यांच्या मताची आघाडी उदयसिंह पाटील यांना पार करण्यात अपयश आले. त्यामुळे धैर्यशील पाटील हे एकमेव विरोधी उमेदवार म्हणून निवडून आलेत. विजयानंतर सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी, गुलालाची उधळण व आतशबाजी केली.
विजयी उमेदवार :
राजाराम कवडे, धीरज डोंगळे, धैर्यशील पाटील कौलवकर,मानसिंग पाटील, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील प्रा.ए.डी. चौगले, अभिजीत पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी कारंडे ,डी.आय.पाटील, केरबा पाटील, पांडुरंग पाटील रघुनाथ जाधव ,अक्षय पवार-पाटील, बी.ए. पाटील, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुनील खराडे, सरदार पाटील, सीमा जाधव , रंजना पाटील, दौलू कांबळे,हिंदुराव चौगुले, तानाजी काटकर.