करवीर :
कोगे ता.करवीर येथे खचलेल्या भरावामुळे बंधाऱ्यांला धोका निर्माण झाला आहे.बंधारा वाहून गेल्या नंतर पाटबंधारे खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधलेल्या पूलाचे कंत्राटदार व पाटबंधारे खात्याने तातडीने लक्ष घालून भरावा दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.

सन १९७२ साली सांगरुळ धरण संस्थेच्या वतीने हा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे कुडित्रे, कोगे ,म्हारुळ, बहिरेश्वर, आमशी, सांगरूळ येथील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सुटला आहे. बंधारा सांगरुळ धरण संस्थेचा असताना पाटबंधारे खात्याकडून मात्र शंभर टक्के आकारणी केली जाते.यामुळे धरण संस्थेला दुरुस्तीसाठी पैसा पुरत नाही.सुमारे ५० लाख रुपये पाणीपट्टी पाटबंधारे खात्याला मिळते .त्यापैकी ५० टक्के आकारणी संस्थेला मिळावी, अशी मागणी संस्थेकडून, शेतकऱ्यांच्या कडून गेली अनेक वर्षे सुरू आहे .मात्र पाटबंधारे खात्याकडून दखल घेतली जात नाही. दरवर्षी बर्गे घालने, माती टाकने,व मजुरी यासाठी सुमारे ७० हजार रुपये खर्च होतो, हा संस्थेच्या खर्चातून केला जात आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या वर बसत आहे.
गेल्या वर्षी बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला मोठा पूल बांधण्यात आला. पूल बांधण्यासाठी नदीमध्ये पिलर टाकण्याकरीता पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूने वळविण्यात आला. यामुळे कुडित्रे भागाकडील बंधाऱ्याचा भराव मोठ्या प्रमाणावर वाहून गेला आहे.भराव खचल्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत संस्थेच्या वतीने पाटबंधारे खाते व कंत्राटदार यांना दोन वेळा पत्र देण्यात आले. मात्र पावसाळा संपून कित्येक महिने झाले अद्याप याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी भराव न टाकलेस बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्यास आठ ते दहा गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तम कासोटे, चेअरमन धरण संस्था…..
भराव दुरुस्तीसाठी पाटबंधारे खाते व कंत्राटदार यांना पत्र दिले. कंत्राटदारांनी दुरुस्ती करतो म्हणून शब्द दिला होता, मात्र अद्याप दुर्लक्ष झाले आहे. लोखंडी बर्गे मिळावे यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे प्रस्ताव दिला आहे.