ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही : कोविड योद्धे म्हणून लसीकरणालाही प्राधान्य देणार
कोल्हापूर :
कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यानाही लसीकरणासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सचिव शशिकांत खोत यांनी कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटून निवेदनाने ही मागणी केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे, कोरोनाच्या लढाईत डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासोबतच औषध विक्रेत्यांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सबंध महाराष्ट्रात ७० हजारांहून अधिक औषध विक्रेते आहेत. कोरोना महामारीत या सर्वांनी अहोरात्र अविरत सेवा केली आहे. औषधे देत असताना कोरोना बाधितांचे नातेवाईक किंवा संबंधित यांच्यामुळे औषध विक्रेत्यानाही या संसर्गाची बाधा होत असते. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे हजारो औषध विक्रेते, पत्रकार व त्यांचे कुटुंबीय बाधित झालेले आहेत तर शेकडो मृत्यू पावलेले आहेत.