जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धनासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे भरघोस निधीची मागणी
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धनासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून भरघोस निधीची मागणी केली. मा.मुख्यमंत्री महोदयांनी या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीसाठी व दुरूस्तीसाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली.
कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अनेक ऐतिहासिक वारसास्थळे या जिल्ह्यात आहेत. जुना राजवाडा, भवानी मंडप परिसर, नगारखाना, मेन राजाराम हायस्कूल, खासबाग मैदान, मोतीबाग तालिम, भाऊसिंगजी रोड, छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय, दसरा चौक, पंचगंगा घाटावरील संस्थान शिवसागर, नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांचे मंदिर, शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांचे तख्त आदी वास्तूंचा समावेश आहे.
१६ नोव्हेंबर रोजी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून निधी देण्याबाबतची पत्रे दिली. यावर सकारात्मक भूमिका घेवून लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.