बीडशेड येथे १६६ तर शिरोली दुमाला येथे ९४ दुकानदार, व्यावसायिक यांची अँटीजन रॅपिड टेस्ट
करवीर :
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अँटीजन रॅपिड टेस्टला गती दिली जात आहे. करवीर तालुक्यातील बीडशेड येथील १६६ तर शिरोली दुमाला येथे ९४ दुकानदार, व्यावसायिक यांची अँटीजन रॅपिड टेस्ट घेण्यात आली.
बीडशेड येथे कसबा बीड ग्रामपंचायत व शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून बीडशेड येथील दुकानदार, व्यापारी यांची महालक्ष्मी हॉलमध्ये काल मंगळवारी टेस्ट घेण्यात आली. १६६ पैकी १५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडशेड दुकानदार, व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये एका किराणा दुकानात काम करणारी बहिरेश्वर येथील एक महिला कामगार पॉझिटिव्ह आली आहे.
शिरोली दुमाला येथे ही दुकानदार, व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांची अँटीजन रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ९४ पैकी ९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. येथील एका चिकन दुकानदारासह त्याची पत्नी, वडील व पुतणी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह रुग्णांना शिंगणापूर कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.
बीडशेड येथील या मोहीमप्रसंगी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कॉ. दिनकर सूर्यवंशी, ग्रामसेवक संदीप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, शिरोली पीएचसीचे आरोग्य साहाय्यक मेहबूब शेख, रेश्मा महापुरे, गणेश पाटील, लॅब टेक्निशियन मंजुषा बन्ने , भक्ती करकरे, प्रतिभा कांबळे यांचा विशेष पुढाकार व सहकार्य लाभले.